कविता, साहित्य आणि संगीत

आत्ताच इंटरनेट वर पाडगावकरांचं कविता वाचन ऐकत होतो. मग थोड्यावेळाने संदीप खरे, मग तिथून सौमित्र आणि मग तिथून कुसुमाग्रज. वेळ कधी गेला कळलंच नाही. गुलजारने कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा सशक्तपणे हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. मग मी गुलजार आणि सौमित्र यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम ऐकला : “मुक्काम पोस्ट ‘कुसुमाग्रज'”.  ह्यात सौमित्र कुसुमाग्रजांची कविता मराठीत वाचतात आणि मग गुलजार त्याचा हिंदी/उर्दू अनुवाद वाचतात.

तो कार्यक्रम संपता संपताच एक धमाल कल्पना डोक्यात अली. पहायला गेलं, तर किती विचित्र प्रकार आहे हा: एकदोन लोक बसून काही शब्द वाचतात आणि समोरची लोकं मंत्रमुग्ध होऊन त्या शब्दांमध्ये बाकी जगाला विसरून जातात! कविताच नाही, हे पुस्तकांच्या बाबतीतही खरंच आहे. कितीतरी वेळा आपण आपल्या आजूबाजूच्या जगातले प्रश्न, आपल्या व्यथा विसरून पुस्तकांच्या जगात हरवून जातो. तीच गोष्ट संगीताची. कुणाला शास्त्रीय संगीत आवडतं तर कुणाला वेस्टर्न क्लासिकल, कुणी क्लासिक रॉक मध्ये स्वतःला विसरतं तर कुणी लोकसंगीतात. कुणाला भारतीय आणि पाश्चात्य संगीताचं fusion आवडतं तर कुणाला जॅझ (jazz). पण संगीतामध्ये स्वतः ला विसरून जाणं हे सगळीकडे सारखंच.

मग मला लगेच लक्षात आलं, की हे कवितावाचन आणि  पुस्तकांमध्ये किंवा संगीतात हरवून जाणं हे काही मराठीपुरता मर्यादित थोडीच आहे – उर्दूमध्येही शायर शायरी वाचतातच की, हिंदीमध्येही कविता सादर करतातच आणि इंग्रजीमध्येपण कवितावाचन होताच की! जपानी भाषेमध्ये पण त्यांच्या हायकू-वाचनाचे कार्यक्रम होतातच. ज्यांना हायकू हा काय प्रकार आहे ते माहित नाही त्यांच्यासाठी थोडंसं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आपल्याकडे मराठीमध्ये जशा चारोळ्या असतात, तसेच जॅपनीज मध्ये हायकू असतात, पण तीन ओळींचे. ह्या तीन ओळींमध्ये कवीला पूर्ण मुभा नसते – त्याच्या/तिच्या तीनोळीला हायकू म्हणण्यासाठी त्याला/तिला काही नियम पाळावे लागतात. काही रचनांमध्ये ५-७-५ अशा पद्धतीने शब्दरचना केली जाते. काही रचनांमध्ये ३-५-३ शब्द. त्यामध्ये पण एक ‘किगो’ म्हणजे एखादा शब्द किंवा phrase (वाक्यांश) हा एखाद्या ऋतूशी निगडित असला पाहिजे, ‘किरेजी’ म्हणजे एखादा शब्द जो दोन वेगवेगळ्या विचारांच्या मध्ये स्वल्पविरामाचं काम करेल, तो असला पाहिजे, एकूण रचनेमधून एखादी भावना उलगडता आली पाहिजे, ती रचना स्वतः मध्ये पूर्ण पाहिजे  इत्यादी, इत्यादी – एक ना दोन – अशा अनेक भानगडी करून त्या कवीला आपल्या तीनोळीला हायकूचा मान प्राप्त करून द्यावा लागतो. हायकू हे आज जगभर प्रसिद्धीस पावलेत.

असो. मला हे लिहितांनाच लक्षात आलं कि जिथे जिथे भाषा अस्तित्त्वात आहे, तिथे तिथे कविता, साहित्य आणि संगीत असणारच – कारण काही गोष्टी ह्या मुळातच ‘वैश्विक’ असतात.


चित्राबद्दल : मात्सुओ बाशो म्हणून एक प्रख्यात हायकू कवी होऊन गेला. त्याचं एक हायकू. तो आपल्या हायकूबरोबर एक चित्रही काढत असे. हे हायकू चित्रात दाखवल्याप्रमाणे शांत डोंगरांमध्ये वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा आवाज ऐकून जी भावना मनात  येते, ती निर्माण करायचा प्रयत्न करतं.

भाषांतर : (प्रचंड lose भाषांतर आहे. मी काही हायकू कवी नाही!)

शांत वातावरण.

पिवळसर डोंगर, पडणारे गुलाब

पाण्याचा शांत आवाज.

 

Leave a comment

search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close